Tuesday, December 9, 2008

साहित्य आणि समाज - अभ्यासाच्या दिशा

चेंबूर- तुर्भे शिक्षण संस्थेचे,
ना० ग० आचार्य व दा० कृ० मराठे
कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय

चेंबूर, मुंबई-४०००७१.



____________________________________________________________
मराठी विभाग
आयोजित एकदिवसीय चर्चासत्र,


साहित्य आणि समाज


अभ्यासाच्या दिशा


(तृतीय वर्ष बी० ए० (मराठी) अभ्यासपत्रिका क्र० ६, साहित्य आणि समाज च्या विशेष संदर्भात)
शनिवार, दिनांक १२ डि्सेंबर २००८
_______________________________________
चर्चासत्राची योजना
_______________________________________










चर्चासत्राचा हेतू व उद्दिष्टे

________________________________________________________________________


साहित्य हा समाजाच्या जडणघडणीतील व विचारप्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. आजच्या स्पर्धेच्या, बाजारीकरणाच्या व अनिश्चिततेच्या वातावरणात स्वतःच्या मूल्यव्यवस्थेबाबत सजगपणे विचार करणे, समष्टीशी स्वतःला जोडून घेणे व त्याआधारे विवेकी व कृतिशील समाजनिर्मिती करणे या व्यापक सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेत साहित्य अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाबत असते. सामाजिक अंगाने केलेला साहित्यविचार म्हणूनच अत्यंत महत्त्वाचा ठरतो.

साहित्य व समाज यांच्या परस्परसंबंधाचा विचार ही गेल्या दीडदोन शतकात विकसित झालेली ज्ञानशाखा आहे. हा अभ्यास एका अर्थाने सांस्कृतिक अभ्यासाचाच (cultural studies) स्वतंत्र विभाग आहे. किंबहुना साहित्यकृतीचा समाजाशी, पर्यायाने संस्कृतीशी व अंतिमतः कल्पनाप्रणालीशी (ideology) संबंध असतो.

तृतीय वर्ष बी० ए० मराठीची अभ्यासपत्रिका क्र० ६, साहित्य आणि समाज ही येथे चर्चासत्राचे निमित्त आहे. विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या या अभ्यासपत्रिकेबाबतच्या शंका व अडचणी यांचे निरसन हा या चर्चासत्राचा एक हेतू आहेच. परंतु एवढीच मर्यादा येथे आखलेली नाही. साहित्य व समाज या अभ्यासविषयाच्या कक्षा लक्षात घेऊन त्या नेमकेपणाने व काटेकोरपणे तपासणे हा चर्चासत्रामागील मुख्य हेतू आहे.

___________________________________________________________






निवेदन




आमच्या महाविद्यालयात दिनांक १२ डिसेंबर २००८ रोजी साहित्य आणि समाज : अभ्यासाच्या दिशा या विषयसूत्रावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे.
प्रश्नपत्रिका क्रमांक ६ (साहित्य आणि समाज) या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने नेमलेल्या साहित्यकृती व साहित्य आणि समाज यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास या विषयांवर येथे विचारमंथन घडावे ही अपेक्षा आहे. त्यात आपला सहभाग प्रार्थनीय आहे. आपल्या विचारांचा व मर्मदृष्टींचा लाभ सर्वांना मिळेल अशी मला खात्री आहे.
या चर्चासत्रात प्रकल्पलेखन - स्वरूप आणि समस्या या विषयावरही एका विभागात चर्चा होणार आहे. त्याकरिता प्रकल्पलेखनाविषयीचे आपले अभिप्राय व गेल्या ३ वर्षातील आपल्या महाविद्यालयातील प्रकल्पविषयांची सर्वसाधारण सूची आपण चर्चासत्रापूर्वी पाठवल्यास त्याचा निश्चितच उपयोग होईल.
चर्चासत्राकरिता आपल्या विभागातील प्राध्यापकांसोबतच आपल्या महाविद्यालयातील चार ते सहा विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
चर्चासत्रासाठीचे नोंदणी शुल्क
प्राध्यापकांकरिता - रुपये 200/-
विद्यार्थ्यांकरिता - रुपये 50/-

असे निश्चित केले आहे.
आपल्या सहकार्याची हार्दिक अपेक्षा आहे.
कळावे.
आपली,


डॉ. देवीदास मुळे (प्राचार्य) प्रा. ज्योती रोटे (
मराठी विभाग)


____________________________________________________








कार्यक्रम पत्रिका


(सकाळी 9.00 ते 9.30)

नोंदणी व चहापान
(सकाळी 9.30 ते 10.00)

उद्घाटन समारंभ
प्रास्ताविक - प्राचार्य डॉ. देवीदास मुळे
उद्घाटन - डॉ. वसंत पाटणकर
(सकाळी 10.00 ते 10.45)

सूत्रकथन - साहित्य आणि समाज - अभ्यासपद्धतीचे स्वरूप
डॉ. हरिश्चंद्र थोरात
(सकाळी 10.45 ते 11.45)

स्त्री -प्रधान साहित्य आणि समाज
(`तिची कथा'च्या विशेष संदर्भात)
अध्यक्ष – डॉ. प्रतिभा कणेकर
निबंधवाचक – डॉ. अरुणा दुभाषी
(सकाळी 11.45 ते दुपारी 12.45)

ग्रामीणतेचे बदलते स्वरूप आणि साहित्य
(`एसईझेड'च्या विशेष संदर्भात)
अध्यक्ष – डॉ. गीता मांजरेकर
निबंधवाचक – प्रा. शैलेश औटी
(दुपारी.12.45 ते 01.45)

भोजन
(दुपारी 1.45 ते 2.45)

महानगरी संवेदना आणि साहित्य
(`निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी'च्या विशेष संदर्भात)
अध्यक्ष – प्रा. पुष्पा भावे.
निबंधवाचक- प्रा. नितीन रिंढे.
(दुपारी 2.45 ते 3.45)

प्रकल्पलेखन - स्वरूप आणि समस्या
अध्यक्ष – डॉ. प्रकाश परब
निबंधवाचक – प्रा. वैशाली जावळेकर
(दुपारी 4.00 ते 5.00)

समारोप
प्रा. दिगंबर पाध्ये
आभार

______________________________________________________________



संपर्क

प्रा० ज्योती रोटे


______________________________________________________________




चर्चासत्रातील निबंध


चर्चासत्रात सादर होणारे सर्व निबंध या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सूत्रकथन- साहित्य आणि समाज : अभ्यासपद्धतीच्या समस्या हा डॉ. हरिश्चंद्र थोरात यांचा व प्रकल्पलेखन - स्वरूप व समस्या हा प्रा० वैशाली जावळेकर यांचा निबंध उपलब्ध झाला आहे.
_________________________________________________

साहित्य आणि समाज - अभ्यासपद्धतीचे स्वरूप

डॉ. हरिश्चंद्र थोरात

साहित्य आणि समाज यांच्यातील परस्परसंबंधाचा अभ्यास अपरिहार्यपणे `साहित्याच्या समाजशास्त्रा'च्या मार्गाने वाटचाल करतो. साहित्याचे अभ्यासक हा अभ्यास शक्यतो आपल्या ज्ञानशाखेकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. तर समाजशास्त्राचे अभ्यास साहित्याला समाजाविषयीच्या ज्ञानाचे केवळ एक साधन समजतात. काहीही असो! साहित्य आणि समाज म्हणजेच साहित्याचे समाजशास्त्र हे स्पष्टीकरण नाकारता येत नाही.
साहित्य आणि ते ज्यात जन्माला येते तो समाज या दोहोंमध्ये साहित्याच्या संदर्भात स्वरूपनिर्णायक असे आंतरिक संबंध असतात असे गृहीत धरून, समाजशास्त्रीय शिस्त पाळून केलेला या संबंधांचा अभ्यास, म्हणजे साहित्याचे समाजशास्त्र होय. साहित्याच्या समाजशास्त्रामध्ये साहित्याभ्यास आणि समाजशास्त्र या दोन ज्ञानशाखा एकत्र आलेल्या असतात.
समाजशास्त्राचा हेतू मानवाच्या सामाजिक वर्तनाचे आकलन करून घेणे हा असतो. या वर्तनाचा विविध सामाजिक संस्थांशी आणि सामाजिक प्रक्रियांशी असलेला संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न समाजशास्त्र करत असते. समाजाच्या संरचनेचे स्वरूप उलगडून दाखवणे आणि समाजाचे कार्य कसे चालते ते स्पष्ट करणे हे हेतूही समाजशास्त्राच्या कक्षेत येतात. मानवी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक व्यवहाराची विविध क्षेत्रे असतात. यातील एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा वर सांगितलेल्या सामाजिक संस्था, सामाजिक प्रक्रिया, समाजाची संरचना, समाजाचे कार्य या गोष्टींशी नेमका काय संबंध असतो, हे सांगण्याचा प्रयत्न समाजशास्त्राकडून होतो, तेव्हा त्या विशिष्ट क्षेत्राचे समाजशास्त्र निर्माण होते. धर्माचे समाजशास्त्र, ज्ञानाचे समाजशास्त्र, कलेचे समाजशास्त्र ही या प्रकारच्या समाजशास्त्रांची उदाहरणे आहेत. या प्रकारच्या समाजशास्त्रांच्या मालिकेत साहित्याच्या समाजशास्त्राचाही समावेश होतो. अर्थातच, साहित्याच्या या समाजशास्त्राची निर्मिती सुनियोजित अभ्यासातून, पद्धतिशास्त्रीय शिस्त पाळून आणि सैद्धान्तिक पायाचा आधार देऊन होणे अभिप्रेत असते. आज आपल्याला ज्ञात असलेल्या साहित्याच्या समाजशास्त्राची पायाभरणी पाश्चात्त्य आणि त्यातूनही प्रामुख्याने युरोपीय अभ्यासकांकडून झाली आहे.
रेनेसांप्रणीत मानवकेंद्रिततावाद आणि त्यानंतर अस्तित्वात आलेले प्रबोधन या दोहोंनी साहित्याच्या संदर्भात प्रतिभावंत लेखकाला केंद्रस्थानी ठेवले होते. प्रतिभावंत लेखकांच्या उत्तरोत्तर वर्धिष्णू होत गेलेल्या अथक प्रयत्नांमधून साहित्याची परंपरा निर्माण झाली, असे या दृष्टिकोणातून मानले जात असे. या दृष्टिकोणानुसार साहित्य म्हणजे लेखकाच्या वैयक्तिक सर्जनशीलतेचा आविष्कार होय. एकोणिसाव्या शतकातील युरोपमध्ये या पारंपरिक दृष्टीशी मतभेद नोंदवणारा वेगळा दृष्टिकोण पुढे येऊ लागला. याचा प्रारंभ मादाम दी स्ताल यांच्या इ. स. १८०० मध्ये प्रकाशित झालेल्या फ्रेंच भाषेतील ग्रंथापासून झाला. फ्रेंच अभ्यासक हिपोलाइत तेन यांचा इंग्रजी साहित्याचा इतिहासही (१८६३) या दृष्टिकोणातून महत्त्वाचा मानला जातो. मार्क्सवादाच्या प्रभावानंतर साहित्याच्या समाजशास्त्राला अधिक नेमकेपणा, शिस्त, खोली व सफाईदारपणा येऊ लागला. नंतरच्या काळात प्लेखानॉव, ल्युकाच, लोवेंथाल, ऍडोर्नो, गोल्डमान, एस्कार्पित, विल्यम्स, होगार्ट, फुको, बॉरदियू यांसारख्या अनेक अभ्यासकांच्या अभ्यासातून साहित्याचे समाजशास्त्र विविध अंगांनी विकसित झाले.
साहित्याचे समाजशास्त्र साहित्याकडे प्रतिभावंत लेखकाचा देशकालनिरपेक्ष आविष्कार म्हणून न पाहता, साहित्याकडे एक सामाजिक रचित म्हणून पाहते. साहित्य समाजात जन्माला येते. समाजनिर्मित मूल्यव्यवस्थेच्या संदर्भात ते अर्थपूर्ण ठरते. समाजाने निर्माण केलेल्या संस्थात्मक जाळ्यामुळे ते समाजाच्या सदस्यांपर्यंत पोहोचते. समाजातील विविध संस्थांशी तसेच प्रक्रियांशी साहित्याचा आंतरिक संबंध असून साहित्याच्या स्वरूपाची जडणघडण विशिष्ट सामाजिक परिस्थितीमुळे होते, हे साहित्याच्या समाजशास्त्राचे मूलभूत गृहीततत्त्व होय. समाजाच्या काही गरजा साहित्याकडून भागवल्या जात असल्यामुळे ते एक सामाजिक संस्था म्हणूनही कार्यरत असते असे त्यात मानले जाते. विशिष्ट सामाजिक परिस्थितीचा साहित्यावर परिणाम होतो, तसेच, साहित्यही समाजावर परिणाम घडवून आणते, ही भूमिकाही साहित्याच्या समाजशास्त्राने स्वीकारलेली असते. साहित्याची निर्मिती, उत्पादन, वितरण, वाचन, मूल्यमापन या साहित्यव्यवहारांचे विशिष्ट सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात विश्लेषण करणे, हे साहित्याच्या समाजशास्त्राचे कार्यक्षेत्र होय.
समाजाची विशिष्ट अवस्था, विशिष्ट परिस्थिती, विशिष्ट सामाजिक समस्या या गोष्टींचा परामर्श अनेकदा साहित्याकडून घेतला जाणे शक्य असते. साहित्यामधून अशा वेळी सामाजिक तथ्यांचे दर्शन होत असते. इतर पुरावे उपलब्ध नसतील तेव्हा समाजाबद्दलची माहिती देणारा एक दुय्यम दर्जाचा स्रोत म्हणून समाजशास्त्र अशा साहित्याचा उपयोग करून घेत असते. साहित्याचे समाजशास्त्र या प्रकारच्या उपयोगाच्या पलीकडे जाते. ते सकृद्दर्शनी सामाजिक दृष्टीने अर्थपूर्ण वाटणार्‍यामाहितीवर समाधानी राहत नाही. त्याच्या कक्षेत केवळ समाजशास्त्रीय माहिती पुरवणार्‍यासाहित्यकृतीच येत नाहीत. ते समग्र साहित्यव्यवहाराचा समाजाच्या संदर्भात विचार करू पाहते.
विशिष्ट समाजाच्या संरचनेच्या आणि त्याच्या स्तरीकरणाच्या विविध पातळ्यांच्या संदर्भात साहित्याचा अनुबंध स्पष्ट करणे हे साहित्याच्या समाजशास्त्राचे पहिले महत्त्वाचे कार्य ठरते. विशिष्ट समाजामध्ये व विशिष्ट सामाजिक परिस्थितीत साहित्य समाजाच्या संदर्भात वेगवेगळी कार्ये करत असण्याची शक्यता असते. काही समाजांमध्ये साहित्य समाजाच्या इतर आविष्कारांमध्ये त्याचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात येऊ नये अशाप्रकारे मिसळून गेलेले असते.काही समाजांच्या संदर्भात इतर सांस्कृतिक व्यवहारांपासून साहित्याचे वर्तूळ नेमकेपणाने बाजूला काढलेले असते. काही समाजांमध्ये साहित्य समाजापासून सुटका करून घेण्यासाठी उपयोगात आणले जाते, तर काही ठिकाणी साहित्य कल्पनाप्रणालीयुक्त हत्यार म्हणूनही काम करत असते. अनेकदा ही तथ्ये एकमेकांत मिसळलेलीही असतात. या तथ्यांचे विश्लेषण करून त्यांची समाजाच्या संदर्भातील प्रस्तुतता जाणून घेण्याचा प्रयत्न साहित्याच्या समाजशास्त्राकडून केला जातो.
साहित्याच्या समाजशास्त्रामध्ये लेखकाच्या निर्मितीच्या अंगाने साहित्यनिर्मितीमध्ये असलेल्या सामाजिक परिमाणांचा शोध घेणे अगत्याचे असते. लेखकाचे हेतू, त्याने साहित्यकृतीमध्ये वापरलेली विविध तंत्रे, त्याने निर्माण केलेला साहित्यकृतीचा रूपबंध, सामाजिक व्यवहाराशी विशेष संबंधित आहेत असे वाटणारी अथवा न वाटणारी आशयसूत्रे या सर्व गोष्टींची समाजसंबद्धता जाणून घेणारा अभ्यास साहित्याच्या समाजशास्त्रामध्ये अभिप्रेत असतो. एखादा सर्जनशील लेखक निसर्गाचे किंवा मानवी भावनांचे चित्रण कसे करतो, पात्रांचे हावभाव आणि मनोवस्था कशा टिपतो, समूहातल्या किंवा एकांतातल्या वर्तनाचे चित्र कसे रंगवतो, वर्णनावर किंवा संवादावर कसा भर देतो, या गोष्टी प्रथमदर्शनी समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून विशेष महत्त्वाच्या वाटत नसल्या तरी वैयक्तिक आयुष्याच्या अत्यंत खाजगी आणि आंतरिक स्तरापर्यंत सामाजिक पर्यावरण कसे पोहोचले आहे, हे जाणून घेण्यासाठी या गोष्टींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कल्पित पात्रांचा अनुभव विवक्षित ऐतिहासिक परिस्थितीशी जोडणे, हे साहित्याच्या समाजशास्त्राचे काम असते. साहित्याचे समाजशास्त्र अशाप्रकारे साहित्याच्या अर्थनिर्णयनमीमांसेचे रूपांतर ज्ञानाच्या समाजशास्त्राच्या एका घटकामध्ये करत असते. लेखकाच्या निर्मितीचा असा वेध घेणे हे साहित्याच्या समाजशास्त्राचे वैध असे कार्य आहे.
लेखकाला समाजात कोणते स्थान आहे या प्रश्नाचा विचारही साहित्याच्या समाजशास्त्रामध्ये अभिप्रेत असतो. त्याला मान्यता कशी मिळते, त्याला असलेल्या प्रतिष्ठेचे स्वरूप कसे असते, साहित्यनिर्मितीमधून त्याला काय प्राप्ती होते, त्याला नीट जगता यावे यासाठी समाजाने कोणती व्यवस्था केलेली असते, सामाजिक नियंत्रणांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव त्याच्यावर कशाप्रकारे पडत असतो यांसारख्या प्रश्नांचे विश्लेषण साहित्याचा अभ्यास करणार्‍यासमाजशास्त्रज्ञाला करावा लागतो. याच संदर्भात तंत्रज्ञान आणि बाजारपेठ, पुस्तकांचे उत्पादन आणि विक्री, प्रकाशक-लेखक यांच्यातील संबंध, पुस्तकाची परीक्षणे लिहिणारे समीक्षक, लेखकाला मिळणारी पारितोषिके, शिक्षणासारख्या संस्थात्मक व्यवहारातील साहित्याचे स्थान यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
साहित्याच्या समाजशास्त्रामध्ये लेखकाइतकेच वाचकाच्या व्यवहारालाही महत्त्व असणे क्रमप्राप्त ठरते. वाचक विविध साहित्यकृतींना प्रतिसाद देत असतात. साहित्यकृतींची अर्थनिर्णयने करीत असतात. त्यांना विशिष्ट प्रकारचे साहित्य आवडत असते किंवा नसते. लेखकाची प्रतिष्ठा वाचकांनी केलेल्या त्याच्या पुस्तकाच्या वाचनावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. वाचकाच्या या व्यवहारांमध्ये सामाजिक संदर्भ काम करत असल्यामुळे ‘एखादे पुस्तक का वाचले जाते’ हा विश्लेषणाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा ठरतो. या मुद्दयाच्या संदर्भात अभिरुचीच्या संकल्पनेला महत्त्व येते. अभिरुचीचा साहित्याच्या मूल्यमापनाशी आणि लेखकाच्या प्रतिष्ठेशी असलेला संबंध हा साहित्याच्या समाजशास्त्रामध्ये सतत चर्चिला जाणारा विषय ठरला आहे.
सर्वव्यापी अशा सामाजिक घटनाक्रमाचा साहित्यव्यवहारावर काय परिणाम होतो हा प्रश्न साहित्याच्या समाजशास्त्राच्या दृष्टिकोणातून महत्त्वाचा ठरतो. युद्धकाळात, शांततेच्या काळात, आर्थिक तेजी-मंदीच्या काळात साहित्याच्या निर्मितीवर काय परिणाम होतो, हे शोधण्याचा प्रयत्न ते करत असते. पुस्तकांचे उत्पादन, वितरण, प्रकाशन, विक्री, खपांचे आकडे, पुस्तकांची किंवा नियतकालिकांची स्पर्धा, विशिष्ट साहित्यप्रकार निर्माण होणे किंवा लोकप्रिय होणे या सर्व गोष्टींचा विशिष्ट कालखंडाशी काय संबंध असतो, हे शोधण्याचा प्रयत्न साहित्याचे समाजशास्त्र संख्यात्मक तसेच गुणात्मक पद्धतिशास्त्रानुसार करत असते. शास्त्रीयतेच्या आणइ वस्तुनिष्ठेच्या दृष्टिकोणातून संख्यात्मक पद्धतिशास्त्र महत्त्वाचे ठरते. साहित्यव्यवहाराबद्दलची अनुभवाधिष्ठित आणि निरीक्षणयोग्य अशी माहिती जमा करणे आणि तिची व्यवस्था लावणे साहित्याच्या समाजशास्त्राच्या दृष्टीने मूल्ययुक्त असते. तथापि, साहित्याच्या समाजशास्त्राचा डोलारा केवळ अशाप्रकारच्या बिनचूक माहितीवरच उभा राहतो, असे म्हणता येत नाही. ही सर्व माहिती समाजशास्त्राच्या गुणात्मक पद्धतींशी जोडावी लागते. साहित्य आणि समाज यांच्यातील संबंधांचे सैद्धांतिक पातळीवरील विश्लेषण हा साहित्याच्या समाजशास्त्राचा अत्यंत महत्त्वाचा व्यवहार असतो. या संदर्भात आवश्यक असणार्‍यासांकल्पनिक साधनांची निर्मिती करणे, त्यांच्या मदतीने युक्तिवाद करून साहित्य व समाज यांच्यातील संबंधांची व्यामिश्रता उलगडणे, हे साहित्याच्या समाजशास्त्राचे प्रधान कार्य होय. संख्यात्मक विश्लेषणाचा भाग या प्रधान कार्याला पूरक म्हणून अस्तित्वात येतो. त्यामुळेच या क्षेत्रातील अभ्यासकाकडे समाजाविषयीचा सिद्धांतव्यूह असणे अगत्याचे असते. या बाबतीत कुठला तरी सिद्धान्तव्यूह बरोबर असतो असा आग्रह धरता येत नाही व त्याचबरोबर समाजाविषयीच्या सैद्धांतिक भूमिकेची निवड केल्याशिवाय साहित्याच्या समाजशास्त्राची वैध रचना संभवत नाही. साहजिकच समाजाविषयीच्या विविध सिद्धान्तव्यूहांना अनुसरणारी साहित्याची अनेक समाजशास्त्रे निर्माण होणे क्रमप्राप्त ठरते. अलीकडच्या काळात साहित्याच्या समाजशास्त्राच्या क्षेत्रात ही बहुविधता निर्माणही झाली आहे.
साहित्याच्या समाजशास्त्राचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर साहित्य आणि समाज यांच्यातील संबंधांविषयी वेगवेगळ्या भूमिका गृहीत धरल्या गेल्या आहेत, असे आढळून येत. असे असले तरी, या ज्ञानशाखेची जडणघडण प्रामुख्याने मार्क्सवादी अभ्यासकांनी केली आहे, असे म्हणता येते. आर्थिक पाया आणि कल्पनाप्रणालीयुक्त अधिरचना यांच्या संबंधांती मार्क्सवादी धारणांनुसार साहित्याचे स्वरूप कसे नियत होते हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या अभ्यासकांनी केला आहे. तथापि, पित्रिम सोरोकीन यांच्यासारख्या साहित्यादी कलांच्या स्वायत्ततेवर भर देणार्‍याअभ्यासकांनीही या ज्ञानशाखेत भर घातली आहे.
मार्क्सवादी परंपरेमध्ये प्रारंभी साहित्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते आणि साहित्य हे वर्गलढ्यामध्ये वापरले जाणारे एक हत्यार असते, अशी भूमिका घेऊन साहित्याचे समाजशास्त्रीय संदर्भ स्पष्ट करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. तथापि, या भूमिकेमधला नियतत्ववाद जाणवून साहित्य व समाज यांच्यातील व्यामिश्र संबंधांना न्याय देण्याचाही प्रयत्न झालेला दिसतो. विशेषत ल्युकाचपासून या प्रयत्नांना प्रारंभ झालेला दिसतो.
१९६० नंतर समाजशास्त्राच्या क्षेत्रावरील कार्यवादाचे प्रभुत्व कमी झाले. अलीकडच्या काळात समाजाविषयी विविध दृष्टिकोणांतून विचार करणारे सिद्धान्तव्यूह पुढे आले. पाया आणि अधिरचना यांच्यातील संबंध एकमेकांवर परिणाम करणारे असतात, ही गोष्ट समाजशास्त्रज्ञांना महत्त्वाची वाटू लागली. वर्ग आणि वर्गजाणीव या मार्क्सवादी संकल्पना समाज व संस्कृती यांचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी पुरेशा नाहीत याची जाणीव होऊ लागली. यातूनच ‘लिंगभाव’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवणार्‍यास्त्रीवादाच्या विविध रूपांनी साहित्याच्या समाजशास्त्राला स्त्रीवादी परिमाण प्राप्त करून दिले. याच सुमारास तिसर्‍याजगातील अनेक राष्ट्रे वासाहतिक राजवटींमधून मुक्त झाली. वासाहतिकता किंवा उत्तरवासाहिकता या संकल्पना केंद्रस्थानी ठेवून साहित्याचे व संस्कृतीचे विश्लेषण होऊ लागली आणि साहित्याच्या समाजशास्त्राला आणखी एक धुमारा फुटला. याच कालखंडात नवऐतिहासिकतावादी अभ्यासकांनी साहित्याच्या समाजशास्त्राला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आत्मनिष्ठावाद आणि वस्तुनिष्ठावाद यांच्या पलीकडे जाणारी, अभिकर्त्याची संकल्पना गृहीत धरूनही चिद्वादापासून मुक्त राहू शकणारी साहित्याच्या समाजशास्त्राची संकल्पना सिद्ध करण्याचा प्रयत्न या परंपरेतील बॉरदियूसारख्या विचारवंताने केला आहे.
साहित्यविचाराच्या मराठी परंपरेमध्ये वि. का. राजवाडे, श्री. व्यं. केतकर, दि. के. बेडेकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, गं. बा. सरदार, रा. भा. पाटणकर, भालचंद्र नेमाडे, दिगंबर पाध्ये प्रभृतींच्या लेखनामध्ये समाजशास्त्रीय आशयसूत्रे आढळून येतात. तथापि, मराठीमध्ये सांगोपांगपणे व समाजशास्त्रीय शिस्त बाळगत साहित्याचे समाजशास्त्र निर्माण झाले आहे, असे म्हणता येत नाही.
SelectedReferences:

1) RobertEscarpit, Sociology of Literature, Frank Cass & Co. Ltd., London, 1971
2) Arnold Houser, The Sociology of Art,Routledge and Kegan Paul, London, 1982
3) Pierre Bourdieu,The field of Cultural Production,Edited and Introduced byRandal Johnson, Policy Press, Cambridge, 1993
4) Elizabeth and Tom Burns (eds),Sociology of Literature and Drama, Penguin, Hammondsworth.

प्रकल्पलेखन - स्वरूप आणि समस्या

प्रा. वैशाली जावळेकर



अभ्यासपत्रिका क्रमांक ६ साहित्य आणि समाज या विषयाच्या अंतर्गत तृतीयवर्ष कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्पलेखन करणे अपेक्षित आहे. या प्रकल्पलेखनाचे स्वरूप आणि समस्या या विषयावर मी इथे माझ्या निरीक्षणांची मांडणी करणार आहे.

प्रकल्पपद्धती ही एक अध्यापनपद्धती आहे. पुस्तककेंद्री, शिक्षककेंद्री अशा पारंपरिक अध्यापनपद्धतीला छेद देणारी, विद्यार्थ्याला कृतिशील बनवणारी अशी ही अध्यापनाची पद्धत होय. आज शाळा, महाविद्यालय अशा सर्वच शैक्षणिक पातळ्यांवर प्रकल्पपद्धतीचा अवलंब केलेला दिसतो. प्रत्यक्ष अनुभवाद्वारे शिक्षण ही कल्पना प्रकल्पपद्धतीतून अमलात आणली जाते. आज केजी टू पीजी शिक्षणात अनुभवाधिष्ठित अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे. अभ्यासक्रमाची जीवनानुभवाशी सांगड घालण्याच्या दृष्टीने प्रकल्पपद्धती ही आदर्श अध्यापनपद्धती ठरते.

प्रकल्प म्हणजे काय ?

मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करून पाहणारी अध्ययनकृती म्हणजे प्रकल्प. प्रकल्पाची काही स्वरूपवैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
१. प्रकल्पाचा विषय विद्यार्थ्याने स्वेच्छेने निवडलेला असतो. तो शिक्षकाने निवडलेला, लादलेला नसावा.
२. निवडलेला विषय म्हणजे एखाद्या समस्येचा, गृहितकामागच्या वास्तवाचा शोध असतो. ही समस्या वा प्रश्न जाणून घेण्याची गरज, उत्सुकता विद्यार्थ्यांच्या ठिकाणी असावी; तरच विद्यार्थी संशोधनात्मक अध्ययनाच्या अनुभवाला सामोरा जाऊ शकेल.
३. शिक्षण म्हणजे अनुभवाची पुनर्रचना असेल, तर प्रकल्प म्हणजे अनुभवाचे पुनर्रचन करण्याची संधी असते.
४. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पातळीवर स्वयंस्फूर्तता जशी महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे योग्य नियोजन, शिस्त आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता हे घटकदेखील प्रभावी ठरतात.
५. प्रकल्प म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांचे ‘सहअध्ययन’ असते. संदर्भ कसे शोधायचे, टिपणे कशी काढावीत, मुद्द्यांचा आराखडा कसा तयार करावा अशी अभ्यासाला पूरक कौशल्ये शिक्षकाला प्रत्यक्ष शिकवावी लागतात. हे करतेवेळी विद्यार्थ्याला सर्जनशील बनविण्यासाठी शिक्षकाला स्वतःला सतत कल्पक, निर्मितीशील राहावे लागते.
६. प्रकल्प हाती घेताना त्यामागील उद्दिष्टांचे भान प्रकल्पाच्या अभ्यासकाला असायला हवे. मार्गदर्शक म्हणून आपण प्रकल्पाच्या कृतिशीलतेतून काय साधणार आहोत, याचे भान शिक्षकाने विद्यार्थ्याला द्यायला हवे. तरच प्रकल्पलेखनातून निष्कर्षात्मक विधान मांडता येईल. मूल्यमापनाच्या दृष्टीनेही प्रकल्पलेखनामागचा मूळ हेतू विद्यार्थ्याला ठाऊक असेल, तर त्याची अध्ययनकृती योग्य दिशेने होते.
७. प्रकल्पसंहिता म्हणजे विद्यार्थ्याच्या अध्ययनकृतीचे फलित (End Product) असते. आपल्या सर्जनशीलतेचे प्रत्यक्ष नमुनारूप पाहणे हा अध्ययनातील आनंद त्याला मिळतो. प्रकल्पपद्धतीतून सहाध्यायींमध्ये निर्माण होऊ शकणारी निकोप स्पर्धात्मक जाणीव विद्यार्थ्याला चैतन्यदायी ठरते.


प्रकल्पपद्धतीची उपयुक्तता

पदवी-पातळीवर मराठी भाषेचे अध्यापन करीत असताना प्रकल्पपद्धती ही अतिशय उपयुक्त ठरते. कारण बहुतांश वेळा पदवी-पदव्युत्तर पातळीवर भाषाअध्यापन करताना केवळ व्याख्यानपद्धतीचाच वापर होत असतो, ज्यामुळे 'ऐका-लिहा-वाचा` असाच अध्ययनानुभव विद्यार्थ्याला मिळत असतो. साहित्याची व्याख्याने म्हणजे तल्लीन होऊन 'ऐकण्याचा` विषय हेच गृहीत धरलेले दिसते. प्रत्यक्षात साहित्यातील सौंदर्यस्थळांचे वाचन करण्याचा, त्यातील आशयव्यूह उलगडण्याचा, रचनातंत्र समजून घेण्याचा संस्कार विद्यार्थ्यावर बऱयाचदा होत नाही. सगळं कळलं, नोट्स काढल्या, पण लिहायचं कसं कळत नाही. हा सर्वसामान्यपणे विद्यार्थ्यांचा शिक्षकाला प्रश्न असतो. इथेच 'प्रकल्पलेखन` हे विद्यार्थ्याच्या प्रशिक्षणासाठी कसे उपयुक्त ठरते हे लक्षात येईल.

तृतीयवर्ष कलाशाखेच्या मराठीच्या अभ्यासक्रमात प्रकल्पाचे स्थान

१९९५-९६ या शैक्षणिक वर्षापासून तृतीयवर्ष कलाशाखेच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात 'साहित्य आणि समाज` या विषयाचा अंतर्भाव झाला. अभ्यासमंडळाने या अभ्यासपत्रिकेअंतर्गत प्रकल्पलेखनाचाही समावेश केला. या अभ्यासपत्रिकेचे हेतू/उद्दिष्ट लक्षात घेतल्याशिवाय त्या हेतूंची पूर्तता करणाऱया प्रकल्पाविषयी चर्चा करता येणार नाही. अभ्यासक्रमात उल्लेखित अभ्यासपत्रिकेचे हेतू आणि शिक्षकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे यांचा उपयोग नवोदित अध्यापकाला विशेष दिशादर्शक ठरतो. या अभ्यासक्रमाचे तात्त्विक चर्चा, उपयोजनात्मक समीक्षा आणि प्रकल्पलेखन या तीन भागांत वर्गीकरण केलेले आहे. प्रकल्पलेखन हा तिसरा विभाग पहिल्या दोन विभागांच्या आकलनावर आणि प्राप्त कौशल्यांवर अवलंबून असलेला दिसतो. अभ्यासक्रम-मंडळाने निर्देशित केलेले अभ्यासक्रमाचे हेतू पुढीलप्रमाणे -
१. साहित्य आणि समाज-संस्कृती यांच्या सुव्यवस्थित ज्ञानाच्या आश्रयाने साहित्याचा साहित्यलक्ष्यी दृष्टीने अभ्यास करणे.
२. साहित्य आणि समाज-संस्कृती यांच्यामधील परस्परसंबंधाचे स्वरूप स्पष्ट करणे; त्यांचा साहित्याच्या अभ्यासात यथोचित उपयोग करणे.
३. विद्यार्थ्याची सामाजिक संवेदनशीलता आणि साहित्यिक संवेदनशीलता संस्कारित करून साहित्याचे वाचन आणि समीक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांची वाङ्मयीन जाण विकसित करणे-वाढविणे.

या हेतूंशी सुसंगत असा लेखनप्रकल्प विद्यार्थ्यांकडून पूर्ण करवून घेणे, त्यासाठी नेमलेल्या साहित्यकृतीखेरीज एकेक साहित्यकृती प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे नेमून देण्याची सूचना अभ्यासक्रमात दिलेली आहे. 'साहित्य आणि समाज` या अभ्यासपत्रिकेच्या अध्यापनपद्धतीविषयी मी बोलणार नसले, तरी वर उल्लेखिलेल्या उद्दिष्टांमधून अध्यापक म्हणून काही गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे, या विषयाचा अभ्यासक्रम समाजलक्ष्यी नाही तर 'साहित्यलक्ष्यी` आहे. समाज- संस्कृतीविषयक सैद्धांतिक विचार हे समीक्षणासाठीचे पूर्वज्ञान म्हणून शिकवावयाचे आहेत. अध्यापनातून अंतिमतः साधायची आहे ती, विद्यार्थ्याची संस्कारित वाङ्मयीन जाणीव आणि कृतिशीलता. प्रकल्पलेखनातून विद्यार्थ्यातील वृत्तीविकसन, कौशल्य आणि अभिरुची-संवर्धन पडताळून पाहता येते. हे साधण्यासाठी अध्यापनात विद्यार्थ्यांना चर्चेसाठी प्रोत्साहन देणे महत्त्वाचे वाटते. कारण या चर्चेतून प्रकल्पलेखनासाठी आवश्यक विश्लेषणक्षमतेचे शिक्षकाला निरीक्षण करता येते आणि गरजेनुसार विद्यार्थ्यांमध्ये ती विकसितही करता येऊ शकते. अनेकदा मराठीच्या विद्यार्थ्यांना 'बोलते` करावे लागते. त्यांना आपला विचार शब्दबद्ध करावयाला शिकवावे लागते.

प्रकल्पलेखनाची पूर्वतयारी अध्यापनातूनच

आपण साहित्यकृतीची समीक्षा कशी करतो याचा अध्ययनानुभव विद्यार्थ्याला मिळायला हवा. जसे भाषेचे ज्ञान प्राप्त झालेल्या विद्यार्थ्याला ‘ पदपरिस्फोट’ किंवा ‘व्याकरण चालवणे’ या विषयीची क्षमता प्राप्त होते, तसे समीक्षेचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्याला साहित्यकृतीतील आशयसूत्र कसे शोधावे, मुळात कथा-कविता यांतील आशयाचे वर्गीकरण कसे करावे, वर्गीकरणासाठी कोणते निकष वापरावेत हे उलगडून दाखवणे गरजेचे आहे. साहित्यकृतीची अंतःस्तरावरची रचना पाहण्याची दृष्टी विद्यार्थ्याला देण्याचा प्रयत्न अध्यापकाने केला पाहिजे. साहित्यकृतीचे विश्लेषण करण्यासाठीच्या क्षमतांचे प्रशिक्षण हे एरवी अध्यापनाच्या प्रक्रियेत नकळत घडत असते. ते जाणीवपूर्वक काही विशिष्ट रचनात्मक तंत्रांच्या आधारे घडावे असे वाटते. यासाठी थोडी नियोजनाची गरज असते. हे सर्व आदर्शवत स्वरूपात पूर्ण करता येईलच असे नाही. पण व्याख्यानांपेक्षा अध्यापनाच्या काही कल्पक तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्याला घडवणे गरजेचे आहे. या संदर्भात स्वतंत्रपणे एक वेगळी चर्चा होऊ शकेल. माझ्या आताच्या मांडणीचा उद्देश हा, अध्यापनाच्या प्रक्रियेतूनच प्रकल्पलेखनासाठी आवश्यक क्षमता-कौशल्यांचे प्रशिक्षण जाणीवपूर्वक दिले पाहिजे, हे अधोरेखित करण्याचा होता.



प्रकल्पलेखनासंदर्भातील अडचणी :

प्रकल्पलेखनासाठी ग्रामीण, नागर, त्री-प्रधान या साहित्यप्रवाहांतील नेमलेल्या साहित्यकृतीखेरीज एका साहित्यकृतीचे स्वतंत्रपणे समीक्षण करणे अपेक्षित आहे. ही साहित्यकृती स्वतंत्रपणे निवडणे या पातळीपासूनच अडचणी जाणवू लागतात. ग्रामीण आणि काही प्रमाणात उपनगरातल्या विद्यार्थ्याला निवडीसाठी मुळात विविध वाङ्मयीन प्रवाहांतील साहित्यकृती वाचनासाठी उपलब्ध होतात का, याविषयी साशंकता वाटते. कित्येकदा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तकांच्या खरेदीसाठी ग्रंथालयीन अनुदानात तरतूद केली जात नाही. त्यामुळे विविध साहित्यप्रवाहातल्या जुन्या-नव्या साहित्यकृतींची अनुपलब्धता हीच मुळात प्रकल्पलेखनाच्या संदर्भातील पहिली अडचण ठरते.
दुसरी अडचण विषयनिवडीच्या संदर्भात जाणवते, ती निवडलेल्या साहित्यकृतीचा 'साहित्यप्रवाह` निश्चित करण्याबाबत. साधारणतः १९८० पर्यंतच्या साहित्यकृतींचे वाङ्मयीन इतिहासात वर्गीकरण झालेले दिसते. त्यामुळे विशिष्ट साहित्यकृती ही अमुक साहित्यप्रवाहातील आहे अशी तयार सारणी वाङ्मयेतिहासाच्या आधारे निवडीसाठी मिळते, जी विद्यार्थ्याला मार्गदर्शक ठरते. पण मुळात ‘साहित्यप्रवाह’ ही संकल्पना व्यापक आणि लवचिक स्वरूपाची आहे. काळानुरूप नव्या वाङ्मयीन प्रवृत्ती उदयास येतात. त्यानुसार उपलब्ध साहित्यकृतींचे नव्याने वर्गीकरण करावे लागते. यातून आकाराला येणारा नवा साहित्यप्रवाह सिद्ध करण्यासाठी इतर साहित्यप्रवाहांशी त्याचे साम्यभेदात्मक नाते तपासावे लागते. या नव्या साहित्यप्रवाहात कोणकोणत्या साहित्यकृतींचा समावेश करता येईल, याविषयी नवी मांडणी करावी लागते. या मांडणीत पूर्वी ज्या साहित्यकृती दलित साहित्यप्रवाहात गणल्या जात होत्या, त्यांचे आज ‘दलित’, ‘नागर’ अशा दोन्ही साहित्यप्रवाहांच्या संकरस्वरूपात नव्याने आकलन होऊ शकते का, याचा विचार करणे गरजेचे आहे. उदाहरण घ्यायचे झाले तर, बाबुराव बागूल यांच्या ‘मरण स्वस्त होत आहे’ या कथासंग्रहातील ‘भूक’ ही कथा वगळता अन्य कथा या दलित आणि नागर अशा दोन्ही प्रवाहांना स्पर्श करताना दिसतात. याला अनुसरून ‘ग्रामीण-दलित, स्त्रीप्रधान-नागर, दलित- स्त्रीप्रधान `आणि 'ग्रामीण – स्त्रीप्रधान, अशा मिश्र साहित्यप्रवाहांची मांडणी करून पाहायला हवी. विषयनिवडीच्या स्तरावरच्या अशा समस्यांचे निराकरण शिक्षक आपल्या पातळीवर करीत असतातच.

कार्यवाहीच्या संदर्भातील अडचणी

‘विद्यार्थ्याने ‘स्वतंत्रपणे’ प्रकल्पलेखन करावे.’ या अभ्यासक्रमातील सूचनेचा अर्थ 'स्वायत्तपणे` करावे असा झाला तर कुठलीच अडचण येत नाही. पण जर प्रकल्पलेखन स्वतंत्रपणे करवून घ्यायचे म्हटले तर शिक्षकाच्या पातळीवर समस्यांना सुरुवात होते. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र मार्गदर्शन करणे अपेक्षित असेल तर ते अभ्यासपत्रिकेला नेमून दिलेल्या तासिकांत घडणे शक्य होत नाही. प्रकल्पलेखन कसे करून घ्यावे त्यासंदर्भातील अपेक्षा, मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे आणि अर्थात हा विषय अंतर्गत मूल्यमापनाचा असल्याने व्यक्तिविशिष्ट पद्धतीने प्रकल्पलेखनाची कार्यवाही घडते. यात सुसूत्रता आणण्यासाठी पुढील प्रकारचे नियोजन करता येईल का, यावर विचार करता येईल.
१. दरवर्षीच्या प्रकल्पाचे विषय नोंदवून ठेवले की पुढच्या तीन वर्षात तो विषय पुनरावृत्त होणार नाही याची दखल घेता येईल
२. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध साहित्यकृतींची मार्गदर्शक सूची साहित्यप्रवाहानुसार पूरक वाचनासाठी ग्रंथसूची तयार करता येईल.
विद्यार्थ्याला प्रकल्प-लेखनाची ढोबळ रूपरेषा किंवा आराखडा देता येऊ शकेल. प्रकल्पाच्यासंदर्भात आपण जेव्हा त्यांच्याशी चर्चा करतो. तेव्हा लक्षात येते की मूळात विद्यार्थ्याला साहित्यकृतीची विविध अंगे, रूपबंध याविषयीची जाणीव नसते. त्याला आशयसूत्र शोधता येत नाही त्यामुळे ही आशयसूत्रे कशी अभिव्यक्त झाली आहेत याविषयी बोलता येत नाही. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्याच्या प्रकल्पाचे स्वरूप म्हणजे : 'साहित्यकृती आणि साहित्यकाराविषयीची माहिती - साहित्यकृतीचे कथानक संक्षिप्तपणे सांगणे - साहित्यकृतीविषयी कुणी काही समीक्षणात्मक विधाने केली आहेत याचा तपशील आणि न विसरता शीर्षकाची समर्पकता` या प्रकारचा असतो. याचाच अर्थ पाठ्यपुस्तकातील प्रश्नोत्तरांच्या पातळीवरील अभ्यासाची पायरी ओलांडून साहित्यकृतीचा समीक्षणात्मक विचार करणे हा अध्ययनप्रक्रियेतील बदल दिसत नाही. त्यासाठी साहित्यप्रकारानुसार तरी कोणकोणत्या मुद्दयांचा, घटकांचा समीक्षा करताना विचार करावा हे दर्शविणारा आराखडा तयार करून त्यासंदर्भाने प्रकल्पलेखनासाठी मार्गदर्शन करता येईल. विद्यार्थी ज्या सामाजिक सांस्कृतिक स्तरातून आला असतो, त्याच्यावर जो शैक्षणिक संस्कार झाला असतो त्या संस्कारातूनच त्याचे साहित्यकृतीविषयक आकलन घडत असते. प्रत्यक्ष अध्यापन करतानाही हे जाणवते की, आजच्या काळातल्या मराठी साहित्याच्या विद्यार्थ्याला 'गौरी देशपांडे` यांच्या साहित्याला प्रतिसाद देता येतोच असे नाही. नवकविता समजून घेण्याची क्षमता त्याच्याकडे आहे असे दिसत नाही. त्यामुळे एकूणच वाङ्मयीन संस्कार कमी झालेला विद्यार्थी साहित्यविषयापासून दूर पळताना दिसतो. त्यामुळे साहित्याला प्रतिसाद देण्याची क्षमता रूजवणे एवढे किमान उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रकल्पाचे मूल्यमापन करता येईल का, याचा विचार व्हावा. मला वाटते साहित्यकृतीविषयी लिहिण्यासाठी ती साहित्यकृती स्वतंत्रपणे 'वाचावी` लागते, हे जबाबदारीचे भान मिळते कारण काहीवेळेला साहित्यकृतीविषयी इतके पृष्ठस्तरावर लिहिलेले दिसते की साहित्यकृती वाचली आहे की नाही याबाबत शंका यावी. त्यामुळे प्रकल्पलेखनातून विद्यार्थ्यावर होणारा पुढील संस्कारही महत्त्वाचा वाटतो -
१. साहित्यकृतीच्या वाचनाचा संस्कार.
२. स्वतंत्र विचार करून साहित्यकृतीसंदर्भात स्वतःचे असे मत तयार करणे.
३. हे मत मुद्देसूदपणे मांडायला शिकणे.
आपल्याला जे सांगायचे आहे ते स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने मांडता येणे प्रयत्नाने शक्य आहे हा आत्मविश्वास विद्यार्थ्याला मिळतो. यातून प्रकल्पलेखन हे विद्यार्थी आणि परीक्षार्थी या दोन्ही अंगांनी वृत्तिविकास घडवणारे ठरते.

शिक्षकाने अध्यापनप्रक्रियेबाबत प्रयोगशील असावे असे म्हटले जाते पण निरस-प्रतिसादशून्य विद्यार्थी ही वास्तविकता आहेच. विद्यार्थी केवळ अंतर्गत मूल्यमापनाचे २० गुण डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प ‘पार पाडतात’. कधीकधी प्राध्यापकही अंतर्गत मूल्यमापनाचा निकष बाळगून काही प्रकल्प मार्गी लावतात. त्यामुळे प्रकल्पपद्धत ही शिक्षक - विद्यार्थ्यांच्या सहअध्ययनाची आदर्श प्रक्रिया प्रत्यक्षात सर्वत्र सफल होताना दिसत नाही.

प्रकल्पलेखन स्वरूप आणि समस्या याविषयावर आपण माझी भूमिका ऐकून घेतलीत याविषयी मी आपले आभार मानते.





Blog Archive